कलाकारांच्या जीवनावर आधारीत “कलांगण” दिवाळी विशेषांकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशनपत्रकार साहिल रेळेकर संपादित कलांगण दिवाळी विशेषांकाच्या माध्यमातून वाचकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल- आ.प्रशांत ठाकूर
पनवेल १७ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
पत्रकार साहिल रेळेकर संपादित “कलांगण” या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तसेच माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांनी देखील कलांगण या दिवाळी विशेषांकासाठी शुभेच्छा देत अंकाचे विशेष कौतुक केले.
यावेळी पनवेल प्रेस क्लब चे अध्यक्ष तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चा चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व नवी मुंबई प्रभारी सय्यद अकबर, जेष्ठ पत्रकार संजय कदम, पत्रकार प्रवीण मोहोकर, रायगड टुडे चे संपादक क्षितिज कडू, राज भंडारी, अनिल राय, विशाल सावंत, सनीप कलोते, शंकर वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाची दिवाळी फार वेगळी आहे. कारण सर्वांच्या आयुष्यात कोरोना नावाच्या अंधकाराची सावली पडली. संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले.
त्यामुळे साहजिकपणे अनेकांच्या आयुष्यात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले.
कोरोनाकाळात लॉकडाऊन मुळे बंधने असल्याने गेले काही महिने कलाक्षेत्र देखील पूर्णपणे ठप्प होते त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. हाताला काम नसल्यामुळे अनेक कलाकारांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले. अशा परिस्थितीत स्वत:ला सावरण्यासाठी आणि यातून पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी एका सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे. ही सर्व वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेऊन “कलांगण” हा दिवाळी विशेषांक प्रकाशित केला असल्याचे पत्रकार साहिल रेळेकर यांनी सांगितले. या दिवाळी अंकात मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते-कलाकार मंडळींनी कोरोनाकाळातील आपले काही चांगले-वाईट अनुभव सांगितले आहेत आणि सर्वांच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी कलांगण या दिवाळी विशेषांकाचे कौतुक करताना याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते बोलताना म्हणाले की, कलांगण या दिवाळी विशेषांकाच्या माध्यमातून लॉकडाऊन काळातील कलाकारांच्या व्यथा मांडण्याचे प्रामाणिक काम साहिल रेळेकर यांनी केले आहे. लॉकडाऊन काळात पूर्णतः कलेवर उदरनिर्वाह करणाऱ्या कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे त्यावेळेचे अनेक चांगले-वाईट अनुभव लेखाच्या माध्यमातून या अंकात मांडण्यात आले आहेत. त्यामुळे या अंकातील लेख वाचल्यानंतर सर्व वाचकांमध्ये तसेच कलाकारांनाही नवी उमेद, ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टीकोन मिळेल यात तिळमात्रही शंका नाही. असे म्हणत आमदार प्रशांत दादा ठाकूर यांनी साहिल रेळेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दिवाळी अंकाच्या प्रकाशनाबाबत पत्रकार साहिल रेळेकर यांनी बोलताना सांगितले की, हा दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ते म्हणजे दैनिक वादळवारा चे संपादक, जेष्ठ पत्रकार श्री विजय कडू (आप्पा).
हा दिवाळी अंक सर्व वाचकांच्या पसंतीस उतरेल आणि यातील कलाकारांचे अनुभव वाचून सर्वांना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करत पत्रकार साहिल रेळेकर यांनी श्री. विजय कडू यांचे विशेष आभार मानले.