आद्यक्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे व्यावसायिक नाट्यप्रयोगासाठीचे भाडे 50% आकारण्याची नाट्यकर्मींची मागणी
पनवेल, दि.30 (वार्ताहर)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील नाट्यगृह हे नाट्यप्रयोगांसाठी कोरोना सुरक्षा नियमावलीच्या अंतर्गत राहून मराठी रंगभूमीदिन या दिवशी म्हणजेच दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी खुली करण्याचा निर्णय घेतला तथापि गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरु व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून प्रयत्न सुरु आहेत कोरोना आणि लॉकडाऊन च्या संकटामुळे नाट्यसृष्टीचे कंबरडे मोडले आहे. म्हणूनच नाट्यनिर्मात्यांना नाटकांचे प्रयोग व नवीन नाट्यनिर्मितीची तयारी थांबवावी लागली याचा मोठा फटका नाट्यनिर्मात्यांना बसला आहे.
तसेच नाट्यसंस्थेतील रंगकर्मींना मदत नेपथ्य प्रॉपर्टी यांचे गोडाऊन भाडे यात नाट्यनिर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही नाट्यव्यवसाय नव्याने सुरु करण्याची हिम्मत बाळगून आहेत. म्हणूनच नाट्यनिर्मात्यांना पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याची आणि आर्थिक सहाय्याची गरज आहे. हि वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे व्यावसायीक नाट्यप्रयोगासाठीचे भाडे ५०% आकारावे. तसेच डीपॉझीटची रक्कम एकदाच घ्यावी. त्याचसोबत संपूर्ण नाट्यगृहाच्या मजल्यांवर सनिटायझर स्टॅन्ड बसविण्यात यावेत. नाट्यगृहातील संपूर्ण उपकरणांची तपासणी करून घ्यावी. प्रत्येक नाट्यप्रयोगानंतर संपूर्ण नाट्यगृह सॅनिटाईझ करून देणे. या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा हि मागणी नाट्यकर्मींनी तसेच मंदार काणे एंटरटेन्मेंट यांनी केली आहे. जेणेकरून पनवेलकर रसिक प्रेक्षकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता येईल अशा आशयाचे निवेदन पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख,पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना देण्यात आले आहे. तसेच याबाबतची माहिती अभिनेते प्रशांत दामले, नाट्यनिर्माते दिलीप जाधव, पनवेलच्या महापौर सौ. कविता चोतमोल, त्याचसोबत ज्येष्ठ शिवसेना नेते तथा रंगकर्मी चंद्रशेखर सोमण यांना देण्यात आली आहे.