मेघराज बारवर पोलिसांची धडक कारवाई; पनवेल परिसरातील लेडीज बार बंद करण्याच्या मागणीला वाढता जोर
पनवेल दि.12 (वार्ताहर)-मेघराज बारवर पोलिसांनी धडक कारवाई केल्याने बारचालकांचे धाबे दणाणले असून पनवेल परिसरातील अशा प्रकारे लेडीज बार सुरू असतील तर त्यांच्यावरसुद्धा संबंधीत पोलिस ठाण्यांनी धडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असून विविध महिला सामाजिक संघटना, संस्था यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे बार कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी करणार आहेत. सीबीडी येथील से.-11 याठिकाणी असणाऱ्या मेघराज बारवर सीबीडी पोलिस ठाण्याचे डॅशिंग परिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील व त्यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री 12.45 वाजता या बारवर कारवाई करून याठिकाणी काम करणाऱ्या महिला या अंग प्रदर्शन करून गिऱ्हाईकांची बिभत्स हावभाव व अश्लिल चाळे करताना आणि येथील बारचे मॅनेजर, स्टूअर्ड, वेटर. ऑर्केस्ट्रा वाजवणारे हे इसम या महिलांना बिभत्स हावभावसाठी प्रोत्साहन देताना आढळून आले होते. तसेच इथे असणाऱ्या गिऱ्हाईकांनी कोव्हिड-19 या आजाराचा संसर्गाचा प्रादूर्भाव असताना बारमध्ये कोणतीही काळजी न घेता विनामास्क गर्दी करून शाशकीय आदेशाचा भंग केला होता. तसेच येथील अस्थापना विनापरवाना विहित वेळेपेक्षा अधिक वेळ संगन्मताने चालू ठेवण्यात आली होती. याची माहिती खास खबऱ्यांकडून वपोनि अनिल पाटील यांना मिळताच त्यांच्यासह सहा पोलिस निरीक्षक नितीन राठोड, पोलिस उपनिरीक्षक नितीन सागळे व पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.चौकट-पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी अशाप्रकारे छमछम बार सुरू होण्याच्या तयारीत आहेत. तर काही छुप्या मार्गाने सुरू झाले आहेत. अशा विरोधातसुद्धा संबंधित पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गासह विविध सामाजिक संस्था, संघटनेच्या मार्फत करण्यात येत आहे. यासंदर्भात लवकर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.