24 ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले
पनवेल दि.13 (वार्ताहर)- तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरवात होणार आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या बारवई, साई, सावळे, खानाव, वलप, आकुर्ली, हरिग्राम, खैरवाडी, नानोशी, पोसरी, खानावले, उमरोली, आपटा, पालीदेवद, कोळखे, सांगुर्ली, मोरबे, उसर्ली खुर्द, पालेबुद्रूक, देवळोली, केवाळे, वाकडी, वाजे व वार्दोली या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम शासनातर्फे जाहीर झाला असून इच्छूक उमेदवारांची लगबग आता सुरू झाली आहे. वेगवेगळ्या आघाड्या, युत्या या निवडणुकीस पाहण्यास मिळणार आहेत. मोठ्या प्रमाणात तरूणवर्गसुद्धा या निवडणुकीत उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.