पल्लवी अविदा हॉटेल ला महानगरपालिका अलविदा करणार का?निवासी वापरासाठी राखीव भूखंडावर थाटले आलिशान हॉटेल भूखंडाचे आरक्षण बदलणारा व्हीलन कोण?हॉटेल मालकाविरोधात सुदाम पाटील यांची तक्रार
पनवेल दिनांक 15(वार्ताहर)
मुंबईचे प्रवेशद्वार आणि नव्या मुंबईचा एअरपोर्ट या मुळे विकासाच्या बाबतीत टॉप गिअर टाकलेल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये सध्या अनधिकृत धंद्यांचा सुळसुळाट बोकाळु लागला आहे. असे असले तरीदेखील पनवेलमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते अशा अवैध धंदे यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. या साटमारी मध्ये असेच एक प्रकरण नुकतेच बाहेर आले आहे.प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के परताव्याच्या योजनेनुसार देण्यासाठी राखीव ठेवलेल्या निवासी वापराच्या भूखंडावर एक आलिशान हॉटेल धूमधडाक्यात व्यवसाय करत आहे.
स्वप्नातील शहरे वसवणारे शिल्पकार अशी बिरुदावली मिरवत आपल्या जमिनी संपादन केल्यानंतर याठिकाणी सिडकोचे प्रस्थ वाढू लागले.त्यांच्याच नियोजनाचा एक भाग म्हणून प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के परतावा यातून द्यावयाच्या भूखंडा पैकी एक भूखंड कळंबोली सेक्टर 10 येथील प्लॉट क्रमांक 6 हा होता.सदर भूखंड निवासी वापराची संकुले उभारण्या च्या करता प्रस्तावित असताना देखील आजमितिला या भूखंडावर एक आलिशान हॉटेल धडाक्याने व्यवसाय करत आहे.आजची परिस्थिती पाहिली तर ज्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत असा स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहेत. गरजेपोटी बांधलेल्या घरांवरती बुलडोजर चालवण्यासाठी सिडकोचे अधिकारी फौज फाटा देऊन गावोगावी शिरत आहेत. एकीकडे स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त चिंतातूर अवस्थेत जिवन व्यतीत करत असताना परप्रांतातून आलेलं एक पैसेवाले प्रस्थ मात्र अधिकाऱ्यांचे हात ओले करून याठिकाणी बिनबोभाट धंदा करत आहे.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी या प्रकारामध्ये पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी निवासी वापराच्या भूखंडावर हॉटेल व्यवसाय उभारण्याच्या कृतीला आक्षेप घेतला असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याच पत्राची एक प्रत नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना देखील दिली असल्याचे समजते.
एकीकडे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त नागरिकांना आपल्या हक्कासाठी झगडावे लागत असताना परप्रांतीयांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरत मात्र स्वतःची गंगाजळी भरण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. परंतु याठिकाणी जर असले भूखंड चोरण्याचे धंदे आपआपले बस्तान मांडत असतील तर एक सजग लोकप्रतिनिधी या नात्याने त्या सार्यांना अटकाव करण्यासाठी मी संघर्ष करण्यासाठी तयार आहे अशी खणखणीत प्रतिक्रिया सुदाम पाटील यांनी दिली आहे.
प्राप्त परिस्थिती मध्ये सुदाम पाटील यांच्या अर्जाची दखल घेत महानगरपालिका अधिकारी या हॉटेलवर जेसीबी चालवण्याची हिंमत करणार का? या प्रश्नाचे उत्तर आगामी काळामध्ये दडले आहे.