पनवेल वाहतूक शाखेतर्फे शहरातील 10 हातगाड्या व 35 वाहनांवर करण्यात आली विशेष कारवाई
पनवेल, दि.20 (संजय कदम)- पनवेल वाहतूक शाखेतर्फे आज वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील 10 फळविक्रेत्या हातगाड्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 35 वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत चालला असून अनेक ठिकाणी फळविक्रेते आपल्या हातगाड्या नियमांचे कोणतेही पालन न करता बेशिस्तपणे उभ्या करून ठेवतात. तसेच अनेक वाहनचालक नो पार्किंग तसेच इतर नियमांकडे दुर्लक्ष करून आपली वाहने उभी करून निघून जातात. याबाबतच्या अनेक तक्रारी पनवेल वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक मोहिते यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार शिंदे, सहाय्यक निरीक्षक म्हात्रे, पोलिस हवालदार खैरावकर, पोलिस नाईक बी.डी. चवरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल एस.पी. कदम या पथकाने उरण नाका, वडघर पूल, पनवेल शहर परिसरात अशा प्रकारे निमयांचे उल्लघंन करणाऱ्या 10 हातगाड्या व 35 वाहनांवर कारवाई केली आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारे कारवाई सातत्याने सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार शिंदे यांनी दिली.