8 वर्षाने खारघर पोलिसांच्या प्रयत्नामुळे घडवून आणली मायलेकींची भेट
पनवेल, दि.31 (संजय कदम) ः आपल्या मातेला शोधण्यासाठी 8 वर्षापासून तिची लेक रणरण फिरत होती. अखेरीस खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि शत्रुघ्न माळी व त्यांच्या सहकार्यांनी आज ही भेट घडवून आणल्याने माय लेकींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
खारघर पोलीस ठाणे येथे सीबीडी बेलापूर एम जी एम हॉस्पिटल येथून माहिती आली की एक वेडसर महिला जखमी अवस्थेत खारघर येथुन आली आहे. म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बेलदार व पो.ना. शिरसाट हे हॉस्पीटल येथे जाऊन सदर महिलेकडे विचारपूस करता ती असभ्य बडबड करीत होती. त्यानंतर त्यांनी तिला विश्वासात घेवून सहानुभूतीपूर्वक अधिक चौकशी केला असता ती गेल्या आठ वर्षापासून पनवेल जवळील शील आश्रम येथे राहण्यास होती असे तीने सांगितले. यावेळी तात्काळ शील आश्रमचे फादर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता सदर महिलेला एक मुलगी असून ती ठाणे येथे राहत असल्याची माहिती कळाली. वेगवेगळ्या पत्याच्या आधारे तिच्याशी संपर्क साधला असता ॠषीविहार मनवेलपाडा विरार या पत्यावर सदर महिलेच्या मुलीचा पत्ता मिळाला. त्यानंतर तिच्याशी संपर्क साधून तिला तात्काळ सीबीडी येथे बोलाविण्यात आले. ज्यावेळी तीने प्रत्यक्ष आपल्या समोर आई उभी असल्याचे पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले व तीने आईला घट्ट मिठी मारली. तिच्या आईचे नाव माधुरी शेलार (50) हे आहे. गेल्या 8 वर्षापासून ती आपल्या आईला शोधत होती. त्यानंतर माधुरी शेलार यांच्यावर योग्य औषधोपचार करून तिची मुलगी प्रिती हिच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी प्रितीने नवी मुंबई पोलिसांसह वपोनि शत्रुघ्न माळी व सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे आभार मानले आहेत.