डॉक्टरांवरील हिंसक हल्ले थांबवा!
‘खुदासा लगे ‘ म्युझिक अल्बम मधून अनोखे आवाहन
श्रुराज प्रोडक्शन च्या माध्यमातून अनोखे प्रबोधन
रजत व श्रुणाल जाधव आणि सुप्रसिद्ध गायक विराग मधुमालती यांचा पुढाकार
पनवेल /प्रतिनिधी:- दिवसेंदिवस डॉक्टरांवरील हिंसक हल्ले वाढत चालले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहे. यासंदर्भात सरकारने कायदे केले असले तरी सर्वसामान्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने श्रुराज प्रोडक्शन च्या माध्यमातून खुदासा लगे हा म्युझिक अल्बम तयार करण्यात आला आहे. डॉ. रजत व श्रुणाल जाधव आणि सुप्रसिद्ध गायक विराग मधुमालती यांनी यासाठी पुढाकार घेऊन डॉक्टरांवरील हल्ले थांबवण्याचे सामाजिक आवाहन केले आहे.
डॉक्टर हे खऱ्या अर्थाने रुग्णसेवक असतात. ते रुग्णांचा प्राण वाचवण्यासाठी किंवा ते बरे होण्यासाठी करिता प्रयत्नाची पराकाष्टा करतात. रात्रंदिवस रुग्णांची चिकित्सा आणि त्यांच्यावर औषधोपचार करतात. या पेशातील लोक खऱ्या अर्थाने देवदूत असतात. कित्येक रुग्णांचा जीव डॉक्टर वाचवतात. अनेकांना बरे करून घरी पाठवतात. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांशी जण आपले कर्तव्य निभावतात. असे असताना डॉक्टरांवर अनेक ठिकाणी प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना घडतात. रुग्णालयाची तोडफोड करण्याबरोबरच हिंसक वातावरण निर्माण केले जाते. रुग्णांच्या नातेवाइकांकडून भावना अनावर झाल्यानंतर अशाप्रकारे उग्र स्वरूप धारण होणाऱ्या घटना अनेकदा घडतात. वास्तविक पाहता डॉक्टर हे माणस आहेत. आपल्यातूनच शिक्षण घेऊन ते हा पैशा स्वीकारतात. डॉक्टर हे रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. काहीवेळा त्यांच्या पराकाष्ठेला यश मिळत नाही. रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे उपचार घेत असताना रुग्णांची प्राणज्योत मालवते त्यामुळे काही ठिकाणी नातेवाईक उग्र रूप धारण करून रुग्णालयाची तोडफोड करतात. डॉक्टरांवर जीवघेणे हल्ला करतात. ही गोष्ट वास्तविक पाहता समर्थनीय ठरत नाही. यासंदर्भात सरकारकडून कायदे सुद्धा करण्यात आले आहेत. तरीसुद्धा डॉक्टरांवरील होणारे हल्ले थांबत नाहीत. त्यामुळे समाजामध्ये प्रबोधन आणि जनजागृती करण्याची गरज निर्माण झालेली आहे. रुग्णांचे नातेवाईक तसेच नागरिकांची मानसिकता बदलल्याशिवाय अशा प्रकारच्या घटना थांबणार नाहीत. हीच गोष्ट विचारात घेऊन डॉ रजत जाधव, श्रुणाल जाधव आणि पाच वेळा ग्रीनिज बुक मध्ये नोंद झालेले सुप्रसिद्ध गायक विराग मधुमालती यांनी खुदासा लगे या शीर्षकाखाली म्युझिक अल्बम निर्माण केला आहे. या अल्बमचे निर्माते व दिग्दर्शक म्हणून मधुमालती यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या अल्बम मध्ये डॉक्टर आणि इतर स्टाफ यांनी अभिनय केला आहे. चित्रीकरण सुद्धा दवाखान्यात करण्यात आले आहे. या अल्बमच्या माध्यमातून समाजामध्ये नक्कीच प्रबोधन होईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
कोट
डॉक्टर सुद्धा आपल्यासारखे माणसेच आहेत. त्यांनासुद्धा परिवार आहे. डॉक्टर आपल्या क्षमतेनुसार रुग्णांची चिकित्सा आणि त्यांच्यावर औषधोपचार करतात. त्यांची सातत्याने सेवा करतात. काहीवेळा रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत . कालांतराने तो दगावतो. त्यानंतर त्याचे नातेवाईक उग्र स्वरूप धारण करतात. कायदा हातात घेऊन हिंसा करतात ही बाब समर्थनीय नक्कीच नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही जनजागृती व प्रबोधन करणे हेतू ‘खुदासा लगे ‘हा म्युझिक अल्बम तयार केला आहे. नक्की त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असा आशावाद व्यक्त करीत आहोत.