पनवेल शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
पोस्टाचे 6 कोटी रुपयांचे बनावट किसान पत्र व राष्ट्रीय बचत पत्र तयार करणारी टोळी गजाआड
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः भारतीय डाक विभागाचे किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र बनावट तयार करुन ते खरे असल्याचे भासवुन बँकेमध्ये गहाण ठेवुन कर्ज घेणार्या टोळीतील 4 आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी एचडीएफसी बँक पनवेल येथे सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून सुमारे 6 कोटी रुपयांचे बनावट किसान पत्र व राष्ट्रीय बचत पत्र हस्तगत केले आहेत.
भारतीय डाक विभागाचे किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र बनावट तयार करुन ते खरे असल्याचे भासवुन बँकेमध्ये गहाण ठेवुन कर्ज घेणार्या टोळीतील काही इसम पनवेल येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोउपनिरी सुनिल तारमळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी एचडीएफसी बँक पनवेल येथे सापळा लावुन दोन संशईतास ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे जबळ भारतीय डाक विभागाची 02 बनावट किसान विकास पत्र व 07 बनावट राष्ट्रीय बचत पत्र असे एकूण 9 बनावट दस्तऐवज मिळुन आले.
सदर इसमांना पनवेल शहर पोलीस ठाणे येथे आणुन त्यांच्याकडे कोशल्यपुर्ण तपास करुन सदर किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र हे बनावट असल्याबाबत भारतीय डाक विभागाकडुन पडताळणी करुन घेतली. सदरचे किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्र हे बनावट असल्याने आरोपींविरोधात बाबाराव गणेशराव चव्हाण, वय 24 वर्षे, रा.मु.पो.बोलसा खुर्द, ता.उमरी, जि नांदेड, सुप्रभात मल्लनप्रसाद सिंग, वय 50 वर्षे, धंदा-व्यापार, राहणार एच 4, रूम नं 1003,व्हॅलीशिल्प,सेक्टर 36,खारघर, नवीमुंबई., संजयकुमार अयोध्या प्रसाद, वय 46 वर्षे, धंदा-नोकरी, राहाणार ए 702, साईईक्रिस्टलप्लॉटनं 45,सेक्टर 35 डी, खारघर, नवीमुंबई, दिनेश रंगनाथ उपाडे, वय 39 वर्षे, धंदा कॉन्ट्रॅक्टर,रा. रुम नं. 49, सिंधी कॅम्प, इंदिरानगर, चेंबुर मुंबई पनवेल शहर पोलीस ठाणे येथे 52/2020 भादवि कलम 420, 465, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा.पोलीस आयुक्त श्री बिपिन कुमार सिंह, मा. पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, मा.पोलीस उप आयुक्त श्री.शिवराज पाटील व मा. सहा.पोलीस आयुक्त, श्री नितीन भोसले-पाटील यांनी सदर गुन्हयाचा सखोल तपास करण्याबाबत सुचना दिल्या आहेत
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि (गुन्हे) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री.राहुल सोनवणे, पोउपनिरी सुनिल तारमळे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा कोशल्यपुर्ण तपास करुन खालील आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींपैकी मुख्य आरोपी बाबाराव गणेशराव चव्हाण हा पुर्वी भारतीय डाक विभागात नांदेड येथे पोस्ट मास्तर ( डाक पाल) पदावर नोकरीस होता. तेथे त्याने हेराफेरी केल्याने त्याचेवर फौजदारी कारवाई करुन त्यास निलंबीत करण्यात आले आहे. त्याला पोस्ट खात्याचे कामकाजाची पुर्ण माहीती असल्याने त्याने व त्यांचे इतर साथीदारांसह बनावट किसान विकास पत्र व राष्टीय बचत पत्रे तयार करुन ती विविध पतसंस्था व बँकांमध्ये गहाण ठेवुण त्याबदल्यात कर्ज घेवुन विविध पतसंस्था व बँकांची फसवणुक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये 3 लाख रुपये किमतीचे भारतीय डाक विभागाचे एकुण 6 बनावट किसान विकास पत्र, 02 कोटी रुपयांचे भारतीय डाक विभागाचे एकुण 10 बनावट किसान विकास पत्र, 86 लाख 50 हजार रुपये किमतीचे भारतीय डाक विभागाचे 02 किसान विकास पत्र व 07 राष्ट्रीय बचत पत्र, 1.65,000/- रू. किमतीची एक पांढ-या रंगाची वॅगनर कार, 1,00,000/- रू किमतीची काळ्या रंगाची स्विफ्ट कार, बॉण्ड पेपर, भारतीय डाक विभागाचे एकूण 7 रबरी स्टॅम्प, 7 स्टॅम्प पेपर, 02 चेक, किसान विकास पत्र व राष्ट्रीय बचत पत्राच्याछायांकित प्रती आणि इतर कागदपत्रे असा एकूण 5 कोटी 89 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे करीत आहेत.
