रायगड चा अभिमान असणारे हेमंत पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित
प्रतिनिधी:रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अलिबाग येथील कार्यालयात कार्यरत असणारे हेमंत काशिनाथ पाटील यांना सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.हेमंत पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. दिनांक 26 जानेवारी रोजी झालेल्या ध्वजवंदन सोहळ्या वेळी हेमंत पाटील यांना रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. लवकरच ते दिल्ली येथे पदक प्रदान सोहळ्यासाठी रवाना होणार आहेत.
हेमंत पाटील हे पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्याधिकारी (सी ई ओ) रविंद्र काशिनाथ पाटील यांचे कनिष्ठ बंधू आहेत.पालकांचे छत्र लवकरच हरपल्यामुळे ज्येष्ठ बंधू असणारे रविंद्र पाटील यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या भावंडांचा सांभाळ केला. खडतर परिस्थितीत मिळेल ते काम करत, वेळ पडल्यास मोलमजुरी करून पाटील बांधवांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.हेमंत पाटील हे विद्यार्थी दशेत असल्यापासून ॲथलेटिक्स, कबड्डी,हॉलीबॉल अशा खेळांच्या मध्ये प्रावीण्य मिळवत असत.राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत अव्वल येत त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपला विशेष ठसा उमटविला. स्पोर्ट्स मधील नेत्रदीपक कामगिरी च्या माध्यमातून त्यांनी पोलीस दलामध्ये सेवा रुजू केली.29 जानेवारी 1987 रोजी ते पोलीस सेवेत रुजू झाले. एक अत्यंत प्रामाणिक, सजग आणि कामसू अधिकारी अशी त्यांची ओळख दलामध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आपल्या कर्तव्यांशी एकनिष्ठ राहात त्यांनी नेहमीच आपली सेवा प्रदान केली आहे त्यामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाल्याने रायगड जिल्ह्यातील पोलिस दलासह, हितचिंतक, आप्तेष्ट यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेमंत पाटील यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याचे समजतात त्यांचे बंधू रवींद्र पाटील यांनी अत्यंत भारावलेल्या स्वरांमध्ये आमच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देताना सांगितले की हेमंत यांनी पाटील कुटुंबीयांची शान वाढवली असून ज्या काबाडकष्टाने आम्ही इथपर्यंत आलो आहोत त्या कष्टाचे आज चीज झाले असे मला वाटते.
हेमंत पाटील यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याचे जाहीर होताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पुष्पगुच्छ देऊन हेमंत पाटील यांचे अभिनंदन केले. अलिबाग तालुक्यातील केतके चा मळा येथील हेमंत पाटील हे मूळ रहिवासी आहेत. प्राथमिक शिक्षण येथूनच पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते त्यांचे ज्येष्ठ बंधू रवींद्र पाटील यांच्यासमवेत पनवेल येथे वास्तव्यास आले. सचोटी,दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावरती मनुष्य आपले इप्सित साधू शकतो, मग भले परिस्थिती कितीही आपल्याविरोधात असू देत! हेच पाटील यांच्या दैदिप्यमान यशातून ठसठशीतपणे दिसून येते.