मनोरूग्ण इसमाला पनवेल तालुका पोलिसांनी केले त्याच्या कुटूंबियांकडे सुपूर्त
पनवेल दि. 30 (वार्ताहर): मनोरूग्ण इसमाला अथक प्रयत्न करून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांकडे सुपूर्त केल्याने सदर इसमाच्या नातेवाईकांनी वपोनि रविंद्र दौंडकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक व आभार मानले आहेत. रिटघर येथील पोलीस पाटील दीपक पाटील यांनी मोबाइल फोनद्वारे कळविले की, एक अनोळखी इसम रिटघर गावात जाणाऱ्या रस्त्यावर फिरत आहे व तो बहुधा मनोरुग्ण असल्याने त्याला काही एक सांगता येत नाही.सदर प्राप्त माहितीवरून पोलीस पाटील व नेरे बीटचे अंमलदार ओंबासे यांनी सदर इसमास ताब्यात घेतले व तालुका पोलीस ठाण्यात आणले. नंतर त्याचे नातेवाईक व पत्त्याबाबत चौकशी करता काही एक उपयुक्त माहिती मिळत नव्हती अशा परिस्थितीत त्यास सील आश्रम येथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व शेवटचा पर्याय म्हणून त्यास लिहिण्यासाठी पेन आणि कागद देताच त्यावर त्याने 9619078337 असा मोबाइल नंबर लिहिला. सदर मोबाइल नंबरवर वर संपर्क साधताच समोरील महिलेस मिळून आलेल्या व्यक्तीचे वर्णन व व्हाट्सअप वरून फोटो पाठविला असता सदरहू इसम हा त्यांचा मनोरुग्ण भाऊ असून त्याचे नाव राजू रविंद्र खातू वय 45 वर्ष रा.घर नंबर 6, लुईसवाडी ,साईनाथ नगर असल्याचे सांगितले व तो ठाणे येथून दि.28.1.2021 रोजी सकाळी 10:00 वा.सुमारास घरात कोणालाही काही एक न सांगता कोठेतरी निघून गेला होता व ते त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत.सदर महिलेने तात्काळ त्यांचा भाचा नामे विनोद विकास म्हात्रे वय 33 वर्षे ,रा.तोंदरे गाव ,तळोजा याना पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे पाठविले व सदर मनोरुग्ण इसम हा त्यांचा मामा असल्याची खात्री होताच त्यास सुखरूपपणे त्यांचे ताब्यात देण्यात आले. सदर मनोरुग्ण इसमाची कौशल्यपूर्वक चौकशी करून त्यांच्या नातेवाइकांचे ताब्यात देण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोपाळ, हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलीस अंमलदार सतीश दराडे यांनी महत्वाची भूमिका पार पाडल्याने त्सदर मनोरुग्ण इसमाचे नातेवाइकांनी पोलिसांचे आभार मानले. फोटोः मनोरूग्ण इसमास नातेवाईकांकडे सुपूर्त करताना पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी