कौटुंबिक वादातून पतीने केले पत्नीवर सपासप वार
पनवेल दि. 31 (वार्ताहर): कौटुंबिक वादातून पतीने त्याच्याकडील धारदार हत्याराने पत्नीवर सपासप वार केल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
प्रियंका अविनाश झिंझाळ (वय-25, रा.-कामोठे) या त्यांचे पती अविनाश झिंझाळ (वय-28) व तिची मैत्रीण पुष्पा यांच्यासह कामोठे वसाहतीमधील तवा हॉटेल येथे बसले असताना त्यांच्यात झालेल्या वादातून पती अविनाश याने रागाच्या भरात सोबत आणलेल्या धारदार हत्याराने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर, दोन्ही हातावर व शरीरात्या ठिकठिकाणी सपासप वार करून त्यांना जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रियंका यांना एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आले असून सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.