लॅपटॉप मोबाईल चोरी करणार्या दोघा जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले गजाआड
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः लॅपटॉपसह मोबाईल चोरी करणार्या दोघा जणांना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने गजाआड केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे तळोजा पोलीस ठाणे व नेरुळ पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
अभिषेककुमार सिंग यांच्या चौथ्या माळ्यावरील राहत्या घराच्या टॉयलेट पाईपद्वारे खिडकीच्या स्लायडींग उघडून त्या वाटे प्रवेश करून एक डेल कंपनीचा लॅपटॉप व दोन मोबाईल फोन चोरीस गेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या अनुषंगाने पोलीस शिपाई प्रवीण भोपी व संजय पाटील हे तपास करीत असताना कळंबोली परिसरात जीगर मनोज चंदाराणा (22) या संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार मोहम्मद सागर हुसेन याला सुद्धा ताब्यात घेवून अधिक चौकशीमध्ये त्यांनी तळोजा तसेच नेरुळ परिसरात लॅपटॉप व मोबाईलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शेखर पाटील, पोलीस उपआयुक्त प्रवीण कुमार व सहा.पो.आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि गिरीधर गोरे, सहा.पो.नि.गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, पो.उपनिरीक्षक वैभव रोंगे, स.फौ.सुदाम पाटील, पो.हवा.अनिल पाटील, सुनील साळुंखे, मधुकर गडगे, सचिन पवार, प्रमोद पाटील, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, राजेश बैकर, सचिन पाटील, पो.ना.दिपक डोंगरे, सुनील कुदळे, रुपेश पाटील, सचिन म्हात्रे, राहूल पवार, प्रफुल्ल मोरे, इंद्रजित कानू, पो.शि.संजय पाटील, प्रवीण भोपी आदींच्या पथकाने केली आहे.