पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालयांची दिवसातून दोनवेळा साफसफाई करावी : राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची पनवेल महापालिकेकडे मागणी.
पनवेल / प्रतिनिधी : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे महत्व ओळखून त्याला प्रथम प्राधान्य देत स्वच्छ भारत अभियानाला चळवळीचे स्वरुप दिले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वत: हाती झाडू घेऊन “ ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” चा मंत्र दिला. त्यांनी उचललेल्या या महत्वपूर्ण पावलांमुळे यापूर्वी कधीही नव्हती तेवढी स्वच्छता देशात झाली आहे. त्यानुसार पनवेल महापालिका हद्दीमध्ये वेळोवेळी पनवेल आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता अभियान किंवा मोहीम राबविण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेचा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे हे स्वच्छतेबाबत एकदम कडक शिस्तीचे असून त्यांच्या कार्यकाळात पनवेल महानगर पालिका हद्दीमध्ये स्वच्छतेला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्याकरिता कंत्राटदारास कंत्राट दिले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त एकच वेळेस सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्यात येते. इतर सर्व महानगरपालिका हद्दीतील शौचालयांची साफसफाई दिवसातून दोन वेळेस करण्यात येते मात्र पनवेल महानगर पालिका हद्दीतील शौचालयांची साफसफाई फक्त एकदाच करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दिवसातून एकदाच केलेली साफसफाई हि सार्वजनिक शौचालयांसाठी पुरेशी नसून यामुळे दिवसभर होणाऱ्या वापरातून दुर्गंधीचे साम्राज्य पसरून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांनी हि बाब गांभीर्याने घेऊन पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक शौचालयांची दिवसातून दोनवेळा साफसफाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशित करावे अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी पत्राद्वारे केली आहे.