खारघर परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटनेमुळे नागरिक भयभीत
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः खारघरमध्ये दोन दिवसात दोन चेन स्नॅचींगच्या घटना घडल्या असून या दोन्ही घटनेत लुटारुंनी सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत. खारघर पोलिसांनी या दोन्ही घटनेतील आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
खारघर मधील सेंट्रल पार्क जवळ घडलेल्या पहिल्या घटनेत जयेश सुकलाल पटेल (33) याच्या गळ्यातील 87 हजार 500 रुपये किंमतीची सोन्याची चेन स्वुटीवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी लुटून नेली. खारघर, सेक्टर-21 मध्ये राहणारा जयेश पटेल नेहमीप्रमाणे आपल्या मित्रासोबत सेंट्रल पार्क जवळ मॉर्निंग वॉकसाठी गेला होता. यावेळी तो मित्रासह पायी चालत इस्कॉन मंदिराजवळ आला असताना, त्याच्या पाठीमागून स्वुटीवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून नेली. तर खारघर, सेक्टर-12 मधील रिलायन्स फ्रेस समोर घडलेल्या दुसर्या घटनेत दोघा लुटारुंनी हरजीत कपिलदेव अहवलुवालीया (59) यांच्या गळ्यातील 36 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचून मोटारसायकलवरुन पलायन केले. कामोठे मधील हरजीत अहवलुवालीया या खारघर येथे राहणार्या विवाहित मुलीकडे आल्या होत्या. त्यानंतर त्या रिलायन्स फ्रेश मधून खरेदी करुन बाहेर पडल्या असताना, सदर प्रकार घडला. खारघर पोलिसांनी सदर दोन्ही गुन्ह्यांची नोंद करुन लुटारुंचा शोध सुरु केला आहे.