तोतया टीसीकडून तरुणाची लूट
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः अकोला येथून मुंबईत कामानिमित्त आलेल्या तरुणाजवळचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने टीसी असल्याचे भासवून लुबाडून नेल्याची घटना हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते बेलापूर दरम्यान घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेत बनावट टीसीने लुबाडलेल्या तरुणाचे नाव हर्षल ज्ञानशिल खंडेराव (19) असे असून तो मुळचा अकोला जिल्ह्यातील आहे. हर्षल काही दिवसापूर्वी अकोला येथून पनवेल येथे आला होता. त्यानंतर तो मुंबईतून एक्स्प्रेस गाडीने अकोला येथे जाणार होता. त्यासाठी हर्षलने अकोला येथे जाण्यासाठी एक्सप्रेस गाडीचे तिकीट देखील काढले होते. दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांना लोकल मधून ठराविक वेळेत प्रवास करण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने हर्षलला सीएसएमटी येथे जाण्यासाठी लोकलचे तिकीट मिळाले नाही. त्यामुळे हर्षलने विनातिकीट पनवेल येथून सीएसएमटी लोकल पकडली होती. हर्षल लगेज डब्यातून सीएसटीच्या दिशेने जात असताना त्या डब्यात आलेल्या एका चोरट्याने टीसी असल्याचे भासवून हर्षलकडे तिकीटाची मागणी केली. मात्र, आपल्याकडे तिकीट नसल्याचे त्याने सांगितल्यानंतर तोतया टीसीने त्याला बेलापूर रेल्वे स्थानकात उतरवले. त्यानंतर त्याच्या जवळचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि 40 रुपयांची रोख रक्कम घेऊन त्याला तिकीट खिडकीजवळून टीसीचा फॉर्म घेऊन येण्यास पाठवून दिले. त्यानुसार हर्षल तेथे गेला असताना, तोतया टीसीने त्याचा मोबाईल फोन आणि रक्कम घेऊन पलायन केले. काही वेळानंतर हर्षल सदर ठकाणी परत आला असता, तोतया टीसी तेथे नसल्याचे तसेच त्याचा मोबाईल फोन देखील बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हर्षलने पनवेल रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार तोतया टीसी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.