- महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणास पुन्हा सुरूवात
पनवेल दिनांक 10 : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान पालिकेच्यावतीने राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागात मागील वर्षी पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण चालू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण बंद करण्यात आले होते. मागील आठवड्यापासून हे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
मागील वर्षी पालिकेच्यावतीने 6502 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता उर्वरित पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणानंतर अंतिम यादी शहर फेरीवाला समितीच्यावतीने जाहीर करण्यात येणार आहे . अंतिम यादीतील पथविक्रेत्यांना पालिकेच्यावतीने ‘अधिकृत पथविक्रते ’ म्हणून ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सर्वेक्षण झालेल्या पथविक्रेत्यांनी आठ दिवसाच्या आत प्रभागसमिती ‘ड’ मध्ये आपली कागदपत्रे जमा करावी असे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत 2500 पथविक्रेत्यांनी आपली कागदपत्रे जमा केली आहेत. उर्वरित पथविक्रेत्यांनी आपली कागदपत्रे जमा करावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.