दरोडा टाकण्यासाठी आलेल्या त्रिकूटास गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने घेतले ताब्यात
पनवेल दि.15 (संजय कदम): एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील त्रिकूटासगुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने ताब्यात घेतले आहे.
खारघर येथील से.-15 याठिकाणी असलेल्या सुवर्ण गंगा ज्वेलर्स या दुकानावर एक टोळी दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोल्हटकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक तांबे व भेदोडकर आणि त्यांच्या पथकाने या परिसरात सापळा लावला असता त्याठिकाणी दोन मोटारसायकलीवरूल चार जण व एस्टीम गाडीतील दोघेजण असे सहा जण मिळून ते लुट करण्याच्या उद्देशाने सदर दुकानाकडे जात असताना दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्या लुटारूंची धरपकड करण्याचा प्रयत्न केला असता या पथकाला सिल्वराज मनी नाडर, उर्फ लाल पट्टी, सोडालेमनी माड़ास्वामी हरिजन आणि काशिमनी माडास्वामी तेवर हे हाती लागले. तर बिरजू, मोटे व काळ्या हे तिघाजण संधीचा फायदा घेऊन पसार झाले. पकडलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक रिव्हॉल्व्हरसह जीवंत दोन काडतुसे, कोयता, लोखंडी सत्तूर व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. त्यांच्या अटकेमुळे अनेक लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.