मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केवळ दंड वसुलीसाठी ,पनवेल शहर मनसेचा आरोप .
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महापालिका हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात असू ही कारवाई फक्त आणि फक्त दंड वसुलीसाठी असल्याचा आरोप पनवेल शहर मनसेने केला आहे. याबाबत मनसेने महापालिकेला पत्र देखील दिले आहे. यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रकाश लाड , विधानसभा मतदारसंघ सचिव प्रतीक वैद्य , सचिन सिलकर , नयन मयेकर , इस्माईल तांबोळी , मनविसेचे शहर अध्यक्ष अनिमेष ओझे , अवधूत ठाकूर , हिमांशू पाटील , विशाल चित्रुक आदी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढत फैलाव पाहता शासनाने नियम कठोर केले आहेत. पनवेल महापालिका हद्दीत देखील महापालिका प्रशासन मास्क ना लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसुली करत आहे. पण यावर पनवेल शहर मनसेने आक्षेप घेतला आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे योग्यच आहे पण ही कारवाई फक्त आणि फक्त दंड वसुलीसाठीच केली जात आहे असा आरोप मनसेने केला आहे. दुकानात कोणतेही ग्राहक नसताना , वाहनावर सिंगल सीट असताना किंवा गर्दीत किंवा एक पेक्षा जास्त व्यक्ती तेथे हजर नसताना दंडाची वसुली केली जात आहे. पालिकेचे आरोग्य कर्मचारीच मास्क वापरताना दिसत नाही तरी नागरिकांवर मात्र कठोर कारवाई होत आहे. दुकानातील वस्तू उचलून नेणे, आणि दुकानदारांना धमकावणे असे प्रकार होत आहेत . याबाबत मनसेकडे तक्रारी आल्याचे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. यासाठी मनसेच्या शिष्टमंडळानी पालिकेचे उपायुक्त यांची भेट घेऊन सदरची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी कर्मचाऱ्यांना अशी कारवाई करताना सूचना द्याव्यात अशी मागणी देखील पालिकेकडे करण्यात आली आहे.