पनवेल परिसरात विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. त्या धर्तीवर विकेंड लोकडाऊन करण्यात आले आहे. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजे पर्यंत दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याला पनवेल परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने आवश्यक व गरज असलेले नागरिकच घराबाहेर पडत होते.
पनवेलसह नवीन पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली, करंजाडे आदी ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कडक कार्यवाही करण्यात येत होती. यातील प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी व खात्री करून पुढे सोडण्यात येत होते. नागरिकाने विना कारण बाहेर फिरून नये नियमाचे पालन करावे असे आवाहन प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत होते. अनेक दुकानांना शासनामार्फत परवानगी असतानाही त्यांच्याकडे अध्यादेश न पोहोचल्याने ती दुकाने सुद्धा बंद होती. आज पेपर विक्रेत्यांना सुद्धा पेपर विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. एस.टी.स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन परिसर येथे तुरळक प्रवाशांची ये-जा होती. एक्स्प्रेस महामार्ग व जुन्या महामार्गावरुन मुंबई-गोवा महामार्गावर सुद्धा तुरळक वाहनांची वाहतूक होती. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पनवेल मधील नागरिकांनी बाहेर न जात घरात राहणे पसंद करत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे.