सिडकोचे सफाई कामगार लसीकरणाच्या प्रतीक्षेत; आझाद कामगार संघटनेचे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र
पनवेल दि.02 (वार्ताहर):कोरोना काळात अगदी फ्रंट ला काम करणाऱ्या सिडकोच्या सफाई कामगारांना अद्यापही कोविडची लस देण्यात आली नाही.यामुळे त्यांना कोरोना विरोधात लढा देण्यासाठी अडचणी येत आहेत. आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कामगारांचे त्वरित कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करावे अशी महत्वपूर्ण मागणी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. त्यांनी या आशयाचे पत्र मुख्य अभियंता आणि मुख्य दक्षता अधिकारी यांनाही पाठवले आहे.
सिडको अखत्यारित उलवे, करंजाडे आणि द्रोणागिरी या नोडमध्ये काम करणारे स्वच्छता विषयक कर्मचारी काम करतात. ते सिडकोचे कामगार आहेत. त्याचबरोबर पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील सर्व रेल्वे स्थानक सिडको मुख्यालय आणि इतर क्षेत्रीय कार्यालयात सफाई कामगार काम करतात. धूर फवारणी सह 637 कामगार सिडकोकडे आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्राधिकरणाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. यासाठी आझाद कामगार संघटनेने कायम आवाज उठवलाय . कोरोना वैश्विक संकटात डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्याबरोबरच सफाई कामगार सुद्धा कोविड यौध्दे म्हणून गणले जातात. ते इतरांप्रमाणेच फ्रंटलाइनला काम करतात. त्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो असे असतानाही सिडकोचे हे स्वच्छताविषयक कामगार आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावण्याचे काम करीत आहेत. तरीसुद्धा सिडकोने त्यांचे सरसकट कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यास दुर्लक्ष केले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना दोन डोस देण्यात आले आहे. परंतु सिडकोचा कामगारांना अद्याप एकही कोरोना लसीचा डोस देण्यात आलेला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य अभियंता आणि दक्षता अधिकाऱ्यांना लसीकरणाबाबत निवेदन दिले आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्वरित लसीकरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
कामगारांसाठी आझाद कामगार संघटनेचा लढा
सिडको अंतर्गत नवी मुंबई मधील सर्व रेल्वे स्टेशन 363 सफाई कामगार , सिडको भवन ,रायगड भवन व सिडकोची सर्व कार्यालये 150 उलवे,द्रोणागिरी, करंजाडे नोड 99 धूरफवारणी -25 असे एकूण- 637 सफाई कामगार आझाद कामगार संघटनेचे सभासद आहेत. त्यांच्यासाठी कामगार संघटनेचा सातत्याने लढा सुरू आहे. संबंधितांचे लसीकरण व्हावे यासाठी सुद्धा पाठपुरावा सुरू केला आहे
कोट-
महाराष्ट्र सरकारने पहिला डोस सफाई कामगार, पोलीस बांधव आणि डॉक्टर नर्स यांना देण्याच्या सूचना असताना देखील सिडकोने कोविड लस सफाई कामगारांना दिली नाही .बाजूलाच पनवेल महापालिका ने सफाई कामगारांना कोविड लसीचे दोन डोस दिले आहेत.तर सिडको कडून एकही डोस सफाई कामगारांना देण्यात आलेला नाही. सिडको सफाई कामगारांच्या लसीकरणाबाबत एक प्रकारे उदासीनता दिसून येते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे.