लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे ” पेपरवाल्या काकांना ” मदतीचा हात !
पनवेल / प्रतिनिधी : कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. त्यात काही व्यवसायांवर हजारो लोकांचे कुटुंब अवलंबून असल्याने अशा कुटुंबांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता. ऊन, पाऊस व वाऱ्याची तमा न बाळगता अखंड सेवा पुरविणारा हा घटक आज व्यवसायाची लढाई लढत आहे. स्वतःच्या घरातील आनंदाचा क्षण असो अथवा दुःखद घटना, याचे कोणतेही कारण न देता ठरलेल्या वेळेत आपल्यापर्यंत पेपर पोचविणारे, शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली, तरी आपला पेपर आपल्याला वेळेत देणारे हेच ते ‘पेपरवाले काका’ आज अडचणीत सापडले आहेत. पनवेलमधील अशा पेपरवाल्या काकांना स्टॉलधारकांना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार आज जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे, ओमकार महाडिक, रहीस शेख आदी उपस्थित होते.