पनवेल तालुका पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी मद्यसाठा केला हस्तगत
पनवेल, दि.6 (संजय कदम) ः पनवेल तालुका पोलिसांनी तालुक्यातील दुंदरे, बारवई-पोयंजे, ठोंबरेवाडी, चिखले गाव आदी परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात देशी मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
तालुक्यातील दुंदरे या ठिकाणी एका इसमाकडे गावठी दारु मिळून आली आहे. तर पोयंजे समता नगर बारवई या ठिकाणी दोघा जणांनी मिळून त्यांच्याकडे देशी दारुचा साठा करून तो पान पटरीजवळून विकत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ठोेंबरेवाडी येथे सुद्धा विना परवाना देशी दारु बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून त्याची विक्री करण्यासाठी जवळ बाळगीत असल्याप्रकरणी त्याच्याकडून हजारो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चिखले गाव येथे सुद्धा विना परवाना देशी दारु जवळ बाळगल्याप्रकरणी एका इसमाला ताब्यात घेवून त्याच्याकडून हजारो रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एकाच वेळी पनवेल तालुका पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून मुद्देमाल हस्तगत केल्याने अशा प्रकारे बेकायदेशीररित्या मद्यसाठा करून त्यांचे विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.