शासकीय नियमाप्रमाणे जमिनीचा व्यवहार पूर्ण करूनही आमची फसवणूक झाल्याने न्यायदेवतेने आम्हाला न्याय द्यावा : मोरे कुटुंबियांची मागणी
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील पालेखुर्द या ठिकाणी उलवे येथे राहणारे निशिकांत बन्सी मोरे यांनी त्यांची पत्नी अनिता मोरे यांच्या नावे सर्व्हे नं.68/01/ब या सर्व्हे नंबरमधील साडेचार गुंठे जागा खरेदी केली होती. यासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व शासकीय नियमाप्रमाणे व्यवहार करून पूर्ण केली असतानाही त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव सातबारावरून वगळण्यात आल्याने त्यांना मानसिक धक्का बसला असून न्यायदेवतेने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी निशिकांत मोरे व त्यांच्या पत्नी अनिता मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
यावेळी बोलताना निशिकांत मोरे यांनी सांगितले की, मौजे ः पालेखुर्द येथे दि.17 जानेवारी 2019 रोजी सौ.नसिम अब्दुल रज्जाक मुलानी यांच्या मालकीच्या सर्व्हे नं.68/01/ब या सर्व्हे नंबरमधील साडेचार गुंठे जागा जवळपास 49 लाख रुपयामध्ये खरेदी केली होती. त्याची नोंद पनवेल सब रजिस्टर कार्यालयात पवल 545/2019/14/44 नुसार खरेदी खत केले आहे. परंतु आता आम्ही प्रत्यक्ष जागेवर गेलो असता त्या ठिकाणी सर्व्हे नं.68/01/ब ही संपूर्ण जागा गणपत बाबु दाभणे व विठ्ठल श्रीपत भोसले यांच्यामध्ये यापूर्वीच खरेदी-विक्रीचा व्यवहार झालेला असून सदरहू बाब न्यायप्रविष्ट असल्याचे समजले. सदरहू बाब सौ.मुलानी यांना माहित असताना देखील त्यांनी याची आम्हाला जाणीव करून न देता माझ्याशी व्यवहार पूर्ण करून घेतला. मी शासकीय नियमाप्रमाणे सर्व व्यवहार पूर्ण केलेले असताना देखील माझे व माझ्या पत्नीचे नाव सातबार्यावरुन वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावरुन सौ.मुलानी यांनी आमची घोर फसवणूक केल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच लवकरच त्यांच्याविरोधात न्यायालयाकडे दाद मागणार आहे. तरी न्यायदेवतेने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणाी मोरे यांनी केली आहे.
