26 लाख 77 हजार रुपयांच्या लोखंडी मालाचा अपहार
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः मल्टी स्किल इंजीनियरिंग कंपनी तळोजा एमआयडीसी येथील कच्चा लोखंडी माल डकटिंगचे साहित्य तयार करून देण्यासाठी पुरवला असता त्यापैकी 26 लाख 77 हजार रुपयांच्या मालाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा एमआयडीसी येथील मल्टी स्किल इंजिनिअरिंग कंपनीला हेवी इंजिनिअरिंग लिमिटेड दिल्ली, नोएडा या कंपनीकडून डकटिंगचे मटेरियल बनवून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. त्यांनी मेसर्स सन फब टेक लिमिटेड कंपनी तर्फे सुनील किसनराव अनभोरे (वय 57,राहणार आदई) यांना डकटिंगचे मटेरियल बनवून देण्याचे काम दिले. यावेळी मल्टी स्किल कंपनी तर्फे कंपनीला 138.355 टन कच्चामाल पुरवण्यात आला. त्यापैकी 55.771 टन लोखंडी मालाची परपसर विक्री करण्यात आली. एकूण 26 लाख 77 हजार रुपये किमतीच्या लोखंडी मालाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
