परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार लसीकरणात प्राधान्य,गणेश कडू यांच्या पुढाकाराने झाला वॉक इन लसीकरणाचा मार्ग मोकळा
पनवेल / प्रतिनिधी : शिक्षणासाठी परदेश प्रवास करणाऱ्या पनवेल महानगर पालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे. लसीकरण प्रक्रियेमध्ये अशा विद्यार्थ्यांना आता वॉक इन लसीकरण देण्यात येणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू यांच्या मागणीला यश आल्यामुळे परदेशी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळाला आहे.
कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत प्रभावी हत्यार आहे. लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत जोमाने सुरू झाली होती. परंतु कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्ण संख्या वाढून ऑक्सिजन आणि अँटी व्हायरल इंजेक्शन्स यांचा तुटवडा भासू लागला. याचा थेट परिणाम लसीकरण प्रक्रियेवर झाल्याने वय वर्षे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग मंदावला. त्यामुळे केंद्र सरकारला दोन डोस मधील अंतर वाढवावे लागले. हे अंतर 45 दिवसांवरून 84 दिवस करण्यात आले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र लसीकरण करणे क्रमप्राप्त होते. कोरोनाविषाणू महामारी निवरणाच्या आंतरराष्ट्रीय निकषांअनुसार अशा विद्यार्थ्यांना दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या देशात प्रवेश मिळत नाही. सध्या वय वर्षे 18 ते 45 वयोगटातील लसीकरणासाठी स्लॉट मिळवणे अत्यंत दुरापास्त झाले आहे. मुळात उपलब्ध लसीकरण केंद्रांच्या 50 टक्के क्षमते वरती लसीकरण सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना भल्या पहाटे उठून रांगा लावाव्या लागत आहेत. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्य आहे. याची परिपूर्ण जाण ठेवून गणेश कडू यांनी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे,पालकमंत्री आदिती ताई तटकरे आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे पत्र लिहून परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी केली होती. तूर्तास अशाप्रकारचे प्राधान्य बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पनवेल महानगर पालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना देखील लसीकरणात प्राधान्य मिळावे ही मागणी कडू यांनी केली होती.
गणेश कडू यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आज सोमवार दिनांक 31 मे रोजी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी उद्यापासून लाईफ लाईन हॉस्पिटल येथे परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू करत असल्याची घोषणा केली. याकरता सदर विद्यार्थ्यांनी त्यांचे पारपत्र आणि आय ट्वेन्टी फॉर्म असे दस्तावेज दाखल केल्यानंतर त्यांना वॉक इन लसीकरण करण्यात येईल अशी माहिती गणेश कडू यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना गणेश कडू म्हणाले की अशा विद्यार्थ्यांना साधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान प्रवास करावा लागतो. तूर्तास जरी अशा विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्यात आपण यशस्वी झालो तरी देखील दुसरा डोस घेण्याकरता त्यांना 84 दिवस थांबणे तांत्रिक दृष्ट्या शक्य होणार नाही. त्यामुळे मी पुन्हा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे विनंती करणार आहे की अशा विद्यार्थ्यांना दुसरा डोस देण्यासाठी 45 ते 60 दिवसांचा कालावधी देण्यात यावा.
गणेश कडू यांच्या अत्यंत सजक आणि महत्वपूर्ण मागणीचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व आणि जनमानसाची जाण असलेला नेता असा खाक्या असणाऱ्या गणेश कडू यांच्या या मागणीमुळे परदेशी प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्यात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.