छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाने सत्ता आल्यास मुख्यमंत्री करावे तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल : राजे प्रतिष्ठान कामगार सेना .
पनवेल / प्रतिनिधी : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत चालला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. यावरून राज्यात पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या हालचाली सुरू आहेत. राजकीय चौकटी बाजूला ठेऊन सर्वांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. ही मागणी राज्य व केंद्रातील दोन्ही सरकारपर्यंत पोचविण्याची गरज आहे. त्यासाठी नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे तरी दिली पाहिजे. काहीजण या आरक्षण प्रश्नात खोडा घालण्याचे काम होत आहे. आरक्षण मिळू नये म्हणून न्याय हक्कापासून गरजूंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचा दृष्टीकोन टोलवा टोलवीचा झाला आहे. त्याला आपण सर्वजण कारणीभूत आहोत. कारण आपण संघर्ष करण्याची भूमिका कधी घेतली नव्हती. पण मराठा क्रांती मोर्चा निघाले त्यानंतर सरकार जागे झाले मात्र आजपर्यंत मराठ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. राजकीय पक्ष बाजूला ठेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे तरच हा लढा जिंकणे शक्य आहे. यासाठी आता फक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडूनच समस्त मराठा समाजाला व तरुण पिढीला अपेक्षा आहेत. यासाठी आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मुख्यमंत्री बनवणे गरजेचे आहे तसेच भारतीय जनता पक्षाने देखील राज्यात सत्ता आल्यास श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार करावा. छत्रपती उदयनराजे भोसले हे जेष्ठांपासून तरुणांपर्यंत लोकप्रिय आहे तसेच छत्रपती उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री झाले तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही असे मत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा यांनी व्यक्त केले तसेच मराठा आरक्षणासाठी असणाऱ्या लढ्यात छत्रपतींचा आदेश आला कि आमची भूमिका व सहभाग व्यक्त करून असेही चंद्रकांत धडके मामा यांनी यावेळी बोलताना सांगितले.