कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रासह देशात पुन्हा उभारी देण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
पनवेल दि.05 (वार्ताहर)- कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रासह देशात पुन्हा उभारी देण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताना दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून जनतासुद्धा भाजपाच्या कार्यपद्धतीला वैतागली आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कॉंग्रेस पुन्हा उभारी घेईल व 2024च्या निवडणूकीत कॉंग्रेस पुन्हा सत्तेत आलेला दिसेल असा ठाम विश्वास आज पनवेल येथील कॉंग्रेस कार्यालयात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. आजच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री नसीम खान, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आ. भाई जगताप, किसान सेलचे उपाध्यक्ष पांडे, प्रदेश प्रवक्ते अतूल लोंढे, जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष सुदाम पाटील, नंदलाल मुंगाजी, ताहिर पटेल, नोफिल सय्यद, महिला आघाडीच्या निर्मला म्हात्रे, शशिकला सिंह, शहराध्यक्ष लतिफ शेख, महादेव कटेकर, विश्वजित पाटील, मोहन गायकवाड, माजी उप नगराध्यक्ष आबा खेर, भारती चौधरी, मंजूळा कातकरी, मिलिंद पाडगावकर, अविनाश लाड, राजीव चौधरी, प्रविण कांबळे, त्र्यंबक केणी, मोरे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, भाजपाने मोठमोठे आश्वासने देऊन सत्ता काबीज केली व आता लोकांना भाजपाचे खरे रूप दिसू लागले आहे. त्यामुळे अनेक भाजपचे पदाधिकारी हे कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. आगामी काळात याची झलक पहायला मिळेल. पनवेलमध्ये होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षाचे मंत्री पनवेलकडे जास्तीत जास्त लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोकण दौऱ्यात पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांना हव्या असलेल्या गोष्टी राज्य शासनाकडे व वेळ पडल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मिळवून देणार आहे. सध्या राज्य सरकारने दिलेले पॅकेज हे समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यपालांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी माजी मंत्री नसिम खान यांनीसुद्धा भाजप सरकारवर टिका करून आता सर्वत्र कॉंग्रेसमय वातावरण झाले असून आगामी सर्व निवडणुकीत पूर्ण ताकद लावून लढणार असल्याचे त्यांनी सांगून पनवेलकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी लवकरच पनवेलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. फोटोः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अभिनंदन करताना त्याचप्रमाणे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना