नगरसेवक राजू सोनी यांची प्रकृतीची अनेकांकडून प्रत्यक्ष व मोबाईलद्वारे चौकश
पनवेल दि. 23 (संजय कदम)- दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने सोसायटीच्या एका ठिकाणच्या पंप हाऊसवर एक महाकाय आंब्याचे झाड कंपाऊंड वॉलवर झुकले होते. त्यामुळे दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. याची माहिती मिळताच कार्यतत्पर नगरसेवक राजू सोनी यांनी आपले सहकारी मंदार देसाई याच्यासह त्याठिकाणी धाव घेऊन सदर झाड जेसीबीच्या सहाय्याने हलवत असताना काही फांद्या खाली पडल्याने यात किरकोळ स्वरूपात नगरसेवक राजू सोनी व त्यांचे सहकारी मंदार देसाई हे जखमी झाल्याची माहिती पनवेलभर पसरताच अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व काहींनी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली व त्यांना कुठल्याची प्रकारची गंभीर इजा झाली नसल्याचे पाहून सुटकेचा निश्वाःस टाकला.
शहरातील मिडलक्लास सोसायटीमध्ये प्लॉट नं.११८ येथील साईरत्न सोसायटीच्या आवारातील गेल्या अनेक वर्षांचे जुने महाकाय आंब्याचे झाड यावर्षी अतिवृष्टीमुळे सोसायटीच्या पंप हाऊस वर तसेच कम्पाउंड वॉलवर झुकले होते. कोणत्याही क्षणी आंब्याचे झाड रस्त्यावरील वाहनांवर किंवा रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहून सोसायटीचे चेअरमन दीपक केसरिया यांनी सदरची बाब कार्यतत्पर नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिली. नागरी समस्यांसाठी संपर्क साधताच राजू सोनी नेहमीच तातडीने हजर होत असतात. अश्याच प्रकारे राजू सोनी यांनी घटनास्थळी सहकारी मंदार देसाई याच्यासह त्याठिकाणी धाव घेतली. व नगरपालिकेच्या वृक्षतोड विभागास तसेच अग्निशमन दलाशी संपर्क साधला. परंतु झाड हळूहळू उन्मळू लागल्याने अग्निशमन दलाच्या येण्याची वाट न पाहता त्यादरम्यान जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याकडे झुकलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू असतानाच अचानकपणे आंब्याचे झाड मुळासकट खाली पडू लागले. त्यावेळी झाडाच्या समोरच राजू सोनी उभे असल्याने त्यांच्या अंगावर झाड पडू लागले, त्यातच रस्ता अरुंद असल्याने सोनी यांना बाजूला जाणे अशक्य होते. परंतु सुदैवाने खाली पडणारे झाड जेसीबीच्या पुढील बाजूस असणाऱ्या भागात अडकले. तरीदेखील झाडाच्या फांद्या राजू सोनी यांच्या अंगावर पडल्याने सोनी यांच्या हाताला, पाठीला किरकोळ मार लागून ईजा झाली. रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ दोन्ही दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल जाधव व जवानांनी रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला. या घटनेत एका चारचाकी व दुचाकीचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. राजू सोनी यांच्या तत्परतेचे मिडलक्लास सोसायटीतील रहिवाश्यांनी आभार मानले. तसेच मदतकार्यादरम्यान राजू सोनी यांच्यावर महाकाय आंब्याचे झाड पडता पडता वाचल्याने ‘काळ आला होता; पण वेळ आली नव्हती’ अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे रस्त्यावर अथवा नागरिकांवर झाड पडून मोठा अनर्थ टळल्याने याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर अनेकांनी प्रत्यक्ष राजू सोनी यांची भेट घेतली. त्यामध्ये पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरसेवक, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, समाजबांधव व मित्रमंडळींनी आदींनी आपुलकीने त्यांची चौकशी केली. राजू सोनी यांच्या हातून आत्तापर्यंत संपूर्ण पनवेल तालुक्यात व तालुक्याबाहेर 200च्या वर विविध समाजाचे मंदिरांचे बांधकाम ना नफा ना तोटा तर कित्येक वेळा स्वखर्चाने उभारले आहे. ते सर्व देव यावेळी या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहिले असावेत असे त्यांच्या सोनी कुटूंबियांचे म्हणणे आहे.