उरण तालुक्यातील पुनाडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचा हिरकमहोत्सव
उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील पुनाडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचा हिरकमहोत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात साजरा होत आहे. आजूबाजूला औद्योगिकरणाचा वेढा पडूनही डोंगराच्या कुशीत लपलेल्या व खाडीकिनारी वसलेल्या उरण तालुक्यातील पुनाडे गावाने १९६१ पासून गेली ६० वर्षे श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाची अनोखी परंपरा जोपासली आहे. नारळी पौर्णिमा झाल्यावर श्रावण वद्य प्रतिपदेपासून ह्या सप्ताहाला प्रारंभ होतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीला या सप्ताहाची सांगता होते. ह्या सप्ताहात गावातील हनुमान मंदिरात विधीवतपणे कलश स्थापना करुन २४ तास अखंडपणे नंदादीप तेवत ठेवून नामस्मरण व भजन – पूजन केले जाते. गावातील बुजुर्ग मंडळींनी सुरु केलेली ही परंपरा नवीन पिढीनेही तितक्याच भक्तीभावाने जोपासली आहे. गावातील दिवंगत पांगा ( पांडूरंग ) धाया पाटील यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह १९६१ साली सुरु झाला. याबाबत असे सांगितले जाते की १९६१ साली गावातील तुकाराम नारायण पाटील यांच्या आगारातील शेतात आवटणी ( भाताची लावणी ) करत असताना पुनाडे ग्रामस्थांनी हा सप्ताह साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. सुरुवातीस ह्या उत्सवासाठी शेजारच्या वशेणी गावातील रामदास धोंडू पाटील व राघो महादू ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या सप्ताहासाठी संपूर्ण श्रावण महिन्यात पुनाडे गावात मांसाहारबंदी व दारुबंदी केली जाते. गेली ६० वर्षे मोठ्या जल्लोषात, उत्साहात व आनंदात साजरा होत असलेल्या ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सप्ताहामुळे गावात एकोपा व शांतता नांदत आहे. हेच तर ह्या हिरकमहोत्सवी श्रीकृष्णजन्माष्टमी सप्ताहाचे खरे फलित आहे. आदर्श गावाची जडणघडण करणा-या पुनाडे गावातील हिरकमहोत्सवी सप्ताहाची दखल शासनाने घ्यावी अशी अपेक्षा पुनाडे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.