बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंटद्वारे तरुणीचे मॉर्फ केलेले फोटो व्हिडीओ व्हायरल करणारा आरोपी जेरबंद
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः कळंबोली परिसरात राहणाऱया एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या नावाने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट तयार करुन त्यावर मॉर्फ केलेले तरुणीचे अश्लिल फोटो, व्हिडीओ तसेच अश्लिल मेसेज टाकुन सदर तरुणीची बदनामी करणाऱया आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. अजय देवलाल शिंगणे (20) असे या आरोपीचे नाव असुन त्याने सदर तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने सदर प्रकार केल्याचे कबुल केले आहे.
अज्ञात व्यक्तीने कळंबोलीत रहाणाऱया एका 17 वर्षीय तरुणीच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन तिच्या नावाने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट तयार केले होते. तसेच सदर तरुणीच्या फक्त चेहऱयाचा वापर करुन मॉर्फ केलेले तरुणीचे अश्लिल फोटो व व्हिडीओ तसेच अश्लिल मजकुर इन्स्टाग्रामवर टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे मॉर्फ केलेले सदर फोटो, व्हिडीओ व मेसेज सदर तरुणीच्या खऱया इन्स्ट्राग्राम अकाऊंटमधील 106 मित्र मैत्रिणींना पाठविण्यात आले होते. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर सदर तरुणीने या प्रकाराची माहिती आपल्या आई-वडिलांना देऊन त्याबाबतची तक्रार कळंबोली पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टसह बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. या गुह्याचा समांतर तपास करणाऱया नवी मुंबई सायबर सेलच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक कौशल्याचा वापर तपास सुरु केला असता, अजय शिंगणे या आरोपीने सदर तरुणीचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावर तिचे मॉर्फ केलेले फोटो व व्हिडीओ टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर सेलने या आरोपीला अटक करुन त्याला पुढील कारवाईसाठी कळंबोली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेतील तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे व या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी सांगितले.
चौकट
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात अग्निशस्राचा धाक दाखवून जबरी चोरी व चैन स्नॅचींग केल्याचे 2 गुन्हे दाखल असल्याचे व या दोन्ही गुह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती.