उरणमधील अपघातात बळी पडणाऱ्या घटनेस कारणीभूत कोण ? पोलिस यंत्रणा की कंटेनर यार्ड चालक ?
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )उरणमध्ये वाहनांच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून मंगळवार दिनांक 21/9/2021 रोजी सकाळी 8:15 च्या सुमारास वशेणी गावातील तरुण कामगार संदीप पाटील हा मोटरसायकलवरून कामाला जाताना खोपटे पूल जवळील मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर व मोटारसायकल अपघातात मोटरसायकलस्वार संदीप पाटील या कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यामुळे उरणमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.उरण मधील अपघातात नेहमी बळी जाणाऱ्या घटनेला कारणीभूत कोण? पोलीस प्रशासन की कंटेनर यार्ड चालक ? असा सवाल आता जनतेतून केला जाऊ लागला आहे.
मृत व्यक्ती संदीप पाटील हा उरण तालुक्यातील वशेणी गावचा रहिवाशी असून द्रोनागिरी नोड परिसरात एका खाजगी प्रकल्पात तो सिक्युरिटीचे काम करत होता. खोटा पुलाजवळ भरधाव ट्रेलरने त्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत संपूर्ण उरण तालुक्यात हळहळ व्यक्त केले जात आहे.भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर, ट्रक, कंटेनर चालक यांच्यावर निर्बंध घालण्यात यावे, ठीक ठिकाणी गतिरोधक बांधण्यात यावे,या परिसरात महत्वाच्या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत,संदीप पाटील यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
उरण तालुक्यात जे एन पी टी हे जागतिक बंदर असल्याने येथे कंटेनर यार्डचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे उरण तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध बेकादेशीर वाहनांची पार्किंग सुरू असते. मुख्य रस्त्यावर वाहने उलटेसुलटे लावलेले असतात.अनेक ट्रक चालक, कंटेनर चालक यांच्याजवळ लायसेन्स नसतात. तसेच ट्रक किंवा कंटेनर मध्ये ड्रायवर सोबत क्लीनर(मदतनीस )कधीही नसतो. शिवाय गाड्या, वाहने भर रस्त्यात कुठेही उभ्या केल्या जातात. अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक, कंटेनर चालक यांना कायद्याची भीती उरलेली नाही. त्यामुळे असे अनेक प्रकार घडत चालल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध पार्किंग करणाऱ्या चालक, मालकांवरही कायदेशीर कारवाई केल्यास असे अपघाताचे प्रमाण कमी होतील शिवाय अपघात होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.