बेकायदेशीररित्या वाहन पार्कींगमुळे फुटपाथ झाला आहे गिळंकृत ; व्यापार्यांसह स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त
पनवेल, दि.21 (संजय कदम) ः नवीन पनवेल परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या तसेच चार चाकी वाहने मन मानेल तशी उभी करण्यात येत असल्याने पादचार्यांसाठी ये-जा करण्यासाठी असलेला फुटपाथ गिळंकृत झाला असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह व्यापार्यांनी संताप व्यक्त करून वाहतूक शाखेने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नवीन पनवेल परिसरातील रेल्वे स्टेशन समोरील असलेल्या अनेक सोसायटीच्या परिसरात दुकानात व गल्ल्यांमध्ये बेकायदेशीररित्या दुचाकी व चार चाकी वाहने उभी करून गाडी चालक मालक हे आपल्या कामानिमित्त रेल्वेने जातात. अनेक जण तर दुचाकी वाहने फुटपाथवरच उभी करून निघून जातात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना व व्यापार्यांना तेथून ये-जा करणे मोठे जिकरीचे बनते. या संदर्भात पनवेल वाहतूक शाखेकडे तक्रार करून सुद्धा टोईंग व्हॅन कारवाई करत नसल्याबद्दल येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा रुग्णांना ने-आण करण्यासाठी रुग्ण वाहिका सुद्धा अशा रस्त्यावरुन जावू शकत नाही. तर अचानक आग लागल्यास अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी कसे पोहोचतात असा सवाल सुद्धा येथील रहिवाशी करीत आहेत. याबाबत वाहन चालकांना विचारले असता हा रस्ता तुमच्या मालकीचा आहे का? असा ते सवाल तेथील लोकांना करतात. त्यामुळे अनेक वेळा हाणामारीची वेळ सुद्धा येते. तरी त्याा वाहनांवर नवीन पनवेल वाहतूक टोईंगने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
कोट
पार्कींगच्या सुविधा असताना तेथील पैसे वाचविण्यासाठी अनेक जण आपली दुचाकी वाहने फुटपाथवर तसेच गल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने उभी करून ठेवत असल्याने सर्वांना अडचणीचे झाले आहे. तरी याबाबत महानगरपालिकेसह वाहतूक शाखेने कारवाई करावी.
राजेंद्र कोलकर, स्थानिक रहिवाशी