बचत गटांच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन व महोत्सव उत्साहात संपन्न.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोत्रती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत प्रेरणा महिला ग्रामसंघ व शिवसंग्राम ग्रामसंघ केगाव उरण द्वारे आयोजित उरण पंचायत समिती व उरण नगर परिषदेच्या सहकार्याने विविध स्वयं सहायता समूहांनी (बचत गट ) आणि महिला व्यावसायिकांनी बनविलेल्या उत्पादनांचे भव्य दिव्य प्रदर्शन व विक्री उरण पेन्शनर्स पार्क येथे नगर परिषदेचे शाळेच्या मैदानात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सदर भव्य प्रदर्शन व महोत्सवाचे उदघाटन नगराध्यक्ष सायली म्हात्रे तर दीप प्रज्वलन पंचायत समितीचे सभापती समिधा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक जयश्री पाटील, प्रज्ञा पारधी, जाईली तेरडे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत यांच्यासह बचत गटाचे महिला प्रमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर महोत्सवला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या भव्य प्रदर्शन व महोत्सवाचा नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात फायदा घेतला.