नवीन पनवेल कोमसापचा उपक्रम दिवाळी अंकांच्या भेटीने वृद्धाश्रमातील आजी-आजोबांमध्ये आनंद
पनवेल -(प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेने नेरे जवळील स्नेहकुंज वृद्धाश्रमात दिलेल्या दिवाळी अंकांमुळे आजी – आजोबा आनंदित झाले.
दिवाळी अंक वाचण्याची आवड आहे पण अंक मिळत नाहीत. हे दिवाळी अंक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक आणि साहित्यिक बांधिलकी जपत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेने दिवाळी अंक भेट हा उपक्रम राबविला.
यावेळी शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी,उद्योजक धर्मेश धनेशा , स्नेहकुंज वृद्धाश्रमाच्या संचालिका संगीता जोशी तसेच नितीन जोशी, ज्येष्ठ गझलकार ज्योत्स्ना राजपूत, सुनिता रामचंद्र, गणेश म्हात्रे,सुमंत नलावडे आदी उपस्थित होते.
वृद्धाश्रमाचे संचालक नितीन जोशी यांनी, दिवाळी अंक दिल्याबद्दल आभार व्यक्त केले,अशा मदतीचे हात असतील तर कुठेही काही कमी पडणार नाही अशा आशा व्यक्त केल्या.कोमसापच्या ज्योत्स्ना राजपूत यांनी, दिवाळी अंक प्रकाशित होतात पण ते वाचकांपर्यंत पोहोचलेही पाहिजेत. जे वयोमानाने तसेच दुसऱ्यांवर अवलंबून असतात तर कधी जाऊन घेऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत दिवाळी अंक पोचवण्याचे काम नवीन पनवेल कोकण मराठी साहित्य परिषदेने केले असल्याचे सांगितले. शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, सामाजिक बांधिलकी जपत मराठी साहित्याचा प्रसार- प्रचार व्हावा या उद्देशातून हा उपक्रम राबवला असल्याचे सांगितले.