रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
पनवेल/प्रतिनिधी :आज आपल्या देशात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या आजाराच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे ते रोखण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी बालाजी सिम्फानी या इमारतीच्या आवारात रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक चमच कम, चार कदम आगे’ म्हणजे साखर, मीठ व तेल यांचा आपल्या रोजच्या आहारातील एक चमचा कमी करून रोजच्या चालण्यात चार पावले अधिक वाढवा असे केल्याने आरोग्य सुदृढ व निरोगी राहील असे डॉ.गिरीश गुणे यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद करून शिबिर आयोजनाचे महत्त्व सांगितले.
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, संधिवात, ईसीजी, बॉडी मास इंडेक्स या प्रकारे मोफत तपासणी करून सर्व रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले.
सदर शिबीर आयोजनात रोटरी क्लबच्या आरोग्य संचालिका रो. सायली सातवळेकर कर यांनी पुढाकार घेऊन सर्व रोटरी सदस्यांसह हे शिबिर यशस्वी केले.
डॉ. गिरीश गुणे यांचे सह क्लब अध्यक्ष डॉ. अभय गुरसाळे, डॉ. संजीवनी गुणे, डॉ.सी डी कुलकर्णी, डॉ. संतोष जाधव, डॉ. हेमंत इंगळे, डॉ. लक्ष्मण आवटे, डॉ. राजेश गांधी, डॉ. जया गुरसाळे, डॉ. मिलिंद घरत, डॉ रोहिणी घरत आदी तज्ञ डॉक्टरांनी सर्व रुग्णांची तपासणी केली. रोटरी क्लब च्या इतर पदाधिकारी व सदस्यांचे तसेच बालाजी सिम्फानी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या शिबिराचा १९६ रुग्णांनी लाभ घेतला.