खोपटा नवनगर विकास आराखड्याला सारडे ग्रामपंचायतचा विरोध.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )खोपटा नवनगर क्षेत्रातील 26 गावांचा विकास आराखडा बनविण्यासाठी सिडकोने उरण तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायतींकडून गावांतील घरे,गावठाण,खाजगी जमिनी,शासकीय जमिनी,गुचरण,तळे,विहिरी,अशी सर्व माहिती मागितली आहे.ह्या विकास आराखडयाला विरोध करत सर्व ग्रामपंचायतिनी ग्रामसभेद्वारे विरोधाचे ठराव घेऊन ते शासनाला देण्याचे ठरविले आहे.त्याचाच भाग म्हणून सारडे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा पार पडली.ह्या वेळी विशेष आमंत्रित गावठाण विस्ताराचे अभ्यासक राजाराम पाटील यांचे ग्रामस्थांना मार्गदर्शन लाभले.त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील,जीवन गावंड,व सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी देखील सारडे ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
राजाराम पाटील यांनी गावठाण विस्तारा विषयी माहिती देताना सांगितले की 1967 नंतर गावठाण विस्तार न झाल्याने सिडकोच्या जुन्या गावठाणा पासून 200 मीटर गावठाण वाढवून देण्याचा प्रस्ताव साफ चुकीचा आहे.यावर मार्ग म्हणून जुने गावठाण ते नवीन वाढलेली घरे यांचा सर्व्हे करून जिल्हाधिकाऱ्यांकडून गावाची पुढील पिढी साठी जादा गावठाणाची मागणी करून हद्द निश्चिती करावी.मनोज पाटील यांनी मार्गदर्शन करताना सिडकोच्या एकत्रित सुधारणांचे धोरण कसे फसवे आहे व महालन परिसरात सिडकोने लोकांची कशी फसवणूक केली ते सांगितले.जीवन गावंड यांनी नैसर्गिक वाढीमुळे बांधलेली घरे ही गावठाणाची व्याख्या व्हायला हवी तसेच हे आंदोलन करताना राजकीय चपला लांब ठेवण्याची गरज सांगितली.सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी प्रस्तावना व आभार मानले तसेच पुढील मिटिंग घेऊन गावकमेटी बनविन्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.ह्या सभे साठी ए. डी. पाटील,ध.प.पाटील,छ. ल.पाटील,
दा.प.पाटील,माजी सरपंच संदीप पाटील,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्यामकांत पाटील,केळवणे सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील,ग्रामसेविका संचित केणी,पोलीस पाटील घनश्याम पाटील व सारडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.