परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची माहिती महापालिकेला कळवावी आयुक्त श्री. गणेश देशमुख यांचे आवाहन
पनवेल,दि.2 : ओमीक्रॉन या विषाणूची काही देशांमध्ये लागण झालेली असून पनवेल महापालिका क्षेत्रात याचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता मागील 15 दिवसात किंवा येणाऱ्या काही दिवसात एखादा व्यक्ती परदेशातून आला असेल किंवा येणार असेल तर त्यांची इथंभूत माहिती गृह निर्माण संस्थांनी 8928931041 या क्रमांकावर महापालिकेला कळवावी असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.
दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वान, हाँगकाँग मध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन या कोव्हीडच्या नव्या व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने दक्षता घेण्याचे सूचित केले. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवासींवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महापालिका आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी पालिका क्षेत्रातील नागरिकांना महापालिका क्षेत्रात मागील 15 दिवसात किंवा येणाऱ्या काही दिवसात एखादा व्यक्ती परदेशातून आला असेल किंवा येणार असेल तर त्यांची संपूर्ण माहिती गृह निर्माण संस्थांनी 8928931041 या क्रमांकावर वॉर रूममधील डॉक्टरांना कळवावी असे आवाहन केले आहे. तसेच बेड उपलब्धी संबधितची माहितीही या क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.
कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या कमी झालेली दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन कटाक्षाने केले जात नाही असे दिसून येत आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात घेऊन कोव्हीड विषाणूची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्क, सतत हात धुणे व सुरक्षित अंतर या कोव्हीड सुरक्षा त्रिसूत्रीचेच पालन करणे महत्वाचे आहे. तसेच अजूनही कोव्हीड लसीचे दोन्ही डोस ज्यां नागरिकांचे पूर्ण झाले नाही अशा नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.