उरण काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी पुन्हा साखळी उपोषण. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यात लक्ष घालण्याची मागणी.
उरण दि 31(विठ्ठल ममताबादे )उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असून यामध्ये 2013 च्या केंद्राच्या भू संपादन कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. भविष्यात काळाधोंडा रेल्वे स्टेशन कार्यालयात जी कामगारांची भरती होईल त्यात 100% भरती ही काळाधोंडा रेल्वे प्रकल्पग्रस्तांची करण्यात यावी. रेल्वेची कामे प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावीत. हाऊसकिपींगच्या कामात रेल्वे प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे. रेल्वे स्थानक आवारातील व्यापारी दुकानें /गाळे ही सरकारी फी आकारून मालकी हक्काने किंवा भाडे तत्वावर सरकारी फी आकारून प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे. बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. सदर रेल्वे स्टेशनला उरण कोट हे नाव देण्यात यावे या विविध मागण्या संदर्भात आजतागायत साखळी उपोषण सुरु आहे.तरी अजूनही या शेतकऱ्यांना न्याय मिळालेले नाही.अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्यामुळे आता थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकनेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीच यात लक्ष घालावे अशी मागणी आता उरण तालुक्यातील काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पा करिता रेल्वे व सिडको प्रशासन मार्फत संयुक्त रित्या संपादित करण्यात आली त्याबदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळाले नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी 27/11/2020 पासून कोटनाका येथे रेल्वे प्रकल्पाचे काम बंद करत साखळी उपोषणाला सुरवात केली.मध्येच कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या विनंती नुसार कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता सदर साखळी उपोषण हे 84 व्या दिवशी तात्पुरते स्वरूपात रद्द(स्थगित )करण्यात आले होते.मात्र शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्याने ते साखळी उपोषण पुन्हा दिनांक 15/11/2021 रोजी सुरु झाले आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण असेच सुरु राहणार असल्याचे मत नवनीत भोईर,योगेश गोवारी,निलेश भोईर यांनी व्यक्त केले .मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधीकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे.यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी(उपोषण स्थळी )नवनीत भोईर, योगेश गोवारी,हेमदास गोवारी, सुनील भोईर, सुरज पाटील, भालचंद्र भोईर, महेश भोईर, कृष्णा जोशी, पुरषोत्तम पाटील, सुरेश पाटील, चेतन पाटील, प्रसाद गोवारी, अजित भोईर, राजेश भोईर आदी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.