शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मध्यस्थीने कळंबोलीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
पनवेल दि.०९ (वार्ताहर) : कळंबोली गावातील प्रकल्पग्रस्तांची नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली बांधकामे तोडण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. त्याची जय्यत तयारीही करण्यात आली होती पण शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शिंदे यांच्या दालनात कळंबोली प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन घरांवरील तोड कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे घरत यांचे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारने नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना २५० मिटर गावठाणातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला असून त्याला मान्यता दिली आहे आणि त्याचा जीआर काढण्यात आला आहे. असा निर्णय असतानाही सिडकोने कळंबोली गावातील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेऊन त्याची तयारीही केली होती. याबाबत कळंबोली प्रकल्पग्रस्तांनी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेवून शासनाने २५० मीटर गावठाणातील बांधकामांना मान्यता दिली असताना सिडको अशी कारवाई कशी करू शकतो ती थांबविण्यात यावी अशी विनंती घरत यांच्याकडे केली होती. याबाबत शिरीष घरत यांनी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शिंदे यांची तातडीने भेट घेवून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांची २५० मिटर गावठाणातील बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाने निर्णय घेऊन मान्यता दिली आहे, हे लक्षात आणून दिले आहे. या बाबत सहव्यवस्थापकीय संचालक शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष मुखर्जी यांच्या बरोबर बोलणी करून सिडकोची कळंबोलीतील असलेल्या तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे.
जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या प्रयत्नाने कळंबोली गावातील प्रकल्पग्रस्तच्या गावठाणातील जागेवर नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर करण्यात येणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे कळंबोली प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी शिरीष घरत यांचे आभार मानले. यावेळी तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आत्माराम गावंड, नगरसेवक रविशेठ भगत, मुन्ना शेठ भगत, सामाजिक कार्यकर्ते मायाशेठ भगत, कृष्णा भगत यांच्यासह अनेक कळंबोली गावातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
फोटो : जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे आभार मानताना कळंबोलीतील प्रकल्पग्रस्त