पनवेलमध्ये नेव्हीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला त्रिकुटाने लुटले
पनवेल दि.११ : बीएमसीतील अधिकारी असल्याचे सांगून तिघा लुटारुंनी नेव्हीतील एका सेवानिवृत्त अधिकाऱयाजवळची 45 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने लुटून पलायन केल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील तक्रारदार विजयकुमार शर्मा (64) हे पनवेलच्या तक्का गाव परिसरात राहण्यास असुन ते नेव्हीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. शर्मा हे आपल्या कारने पत्नीसह रायगड बाजार येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर शर्मा यांची पत्नी कारच्या डिकीत सामान ठेवत असताना, शर्मा कार पासून काही अंतरावर उभे होते. यावेळी दोघा लुटारुंनी बीएमसीचे अधिकारी असल्याचे सांगुन शर्मा त्यांच्याकडे मास्कबाबत विचारणा केली. शर्मा यांनी देखील त्यांनी मास्क का घातले नाही, असा प्रतिप्रश्न केल्यानंतर त्यांनी साहेबांकडे नेण्याचा बहाणा करुन त्यांना विश्राळी नाका येथील रुशिदा अपार्टमेंटसमोर नेले. त्यानंतर सदर लुटारुंनी लुटालुटीच्या घटना वाढत असल्याचे सांगुन त्यांना पाकीट, घडयाळ व सोन्याची चैन काढुन देण्यास सांगिलते. मात्र शर्मा यांनी नकार दिल्यानंतर दोघा लुटारुंनी त्यांना पकडून ठेवले, तर तिसऱया लुटारुने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढली. त्यानंतर तिघा लुटारुंनी रिक्षामधुन पळ काढला. त्यामुळे शर्मा यांनी आपल्या कारने सदर लुटारुंचा पाठलाग केला. मात्र सदर लुटारु त्यांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.