मच्छी विक्रेत्या महिलेची लूट; पनवेल रेल्वे पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पनवेल दि.२५ : ठाण्यातून मच्छी विक्री करुन सीबीडीतील दिवाळे गावात परतणाऱ्या मच्छी विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील ८२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात लुटारुने लुटून पलायन केल्याची घटना सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनच्या सबवे मध्ये घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेतील तक्रारदार मिना महादेव कोळी (५४) या सीबीडी बेलापूर येथील दिवाळे गावात राहण्यास असून त्यांचा मच्छी विक्रीचा व्यवसाय आहे. मिना कोळी या नेहमीप्रमाणे ठाणे येथे मच्छी विक्री करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या ठाणे येथून लोकलने सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर डोक्यावर मच्छीची पाटी आणि हातात बास्केट घेऊन दिवाळे गाव येथे जाण्यासाठी सबवे तून खाली उतरत होत्या. याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात लुटारुने मिना कोळी यांच्या गळ्यातील १ तोळे ७५० ग्रॅम वजनाचे ८२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून रेल्वे स्टेशनवर पलायन केले.त्यामुळे मिना कोळी यांनी देखील सदर लुटारुच्या पाठीमागे धाव घेतली. मात्र, सदर लुटारु लोकल गाडीत चढून दुसऱ्या फलाटावर उतरुन पळून गेला. त्यामुळे मीना कोळी यांनी दुसऱ्या लोकलने सीवुडस् रेल्वे स्टेशनवर जाऊन लुटारुचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांना सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.