एसटी आगार व्यवस्थापकाचा अजब फतवा.ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्त करा अन्यथा सेवा बंद.
वर्ल्ड फेम न्युज /प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेण एसटी आगार व्यवस्थापकांच्या अजब फतव्याने पेण ते वडखळ दरम्यान असलेल्या ३ ग्रामपंचायतींच्या सरपंचाना जोर का झटका लागला आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सर्विस रोडची ग्रामपंचायतीने त्वरित दोन दिवसात दुरुस्ती करावी अन्यथा एसटी सेवा बंद करण्यात येईल असा फतवा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना बजाविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू असून सदर कामाचे नियोजन योग्य प्रकारे न करण्यात आल्यामुळे अनेक गावांना पहिल्याच पावसात पुराचा फटका बसला आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या गावांना नॅशनल हायवे कडून सर्विस रोड बांधून देण्यात आले. परंतु या सुमार दर्जाच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सहा इंच ते दीड फुटापर्यंत खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे.
या सर्विस रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटीची स्प्रिंग तुटणे व टायर पंचर होणे या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पेण एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी कांदळे ग्रामपंचायत, उंबर्डे ग्रामपंचायत, मळेघर ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींना लेखी पत्र पाठवून दोन दिवसात रस्ते दुरुस्त करून घ्या अन्यथा एसटीची सेवा बंद करण्यात येईल असा आदेश दिला आहे.
या गाड्या पेण ते वडखळ सर्विस रोड वरून न जाता त्या मुंबई-गोवा हायवेच्या पुलावरून नेण्यात येतील असा धमकीवजा इशारा या पत्रात देण्यात आला आहे.
“‘ सदरचे रस्ते हे नॅशनल हायवे अंतर्गत येतात त्यांना हे पत्र देण्याऐवजी छोट्या छोट्या गरीब ग्रामपंचायतींना अशा प्रकारचे आदेश देऊन एसटी प्रशासनाने आमची क्रूरचेष्टा केली आहे.”‘ अशी प्रतिक्रिया कांदळे ग्रामपंचायतीचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी दिली.
“‘ कांदळे ग्रामपंचायत हद्दीतून सुमारे १५० ते २०० विद्यार्थी दररोज शिक्षणाकरिता एसटीने प्रवास करतात.
तसेच जेष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, व ग्रामस्थ एसटीने प्रवास करतात. एसटी सेवा बंद झाल्यास गोरगरीब ग्रामस्थांना मोठा आर्थिक फटका बसेल”‘ अशी व्यथा सरपंच मुरलीधर भोईर यांनी व्यक्त केली.
मुंबई-गोवा हायवेचे काम सुरू असताना कांदळे ग्रामपंचायतीचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी अनेक वेळा प्रांत अधिकारी यांच्या दालनात नॅशनल हायवेचे अधिकारी, ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेऊन पुलासाठी करण्यात येत असलेल्या भरावामुळे गावातील पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद होईल. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होईल असे वारंवार लक्षात आणून दिले. प्रांताधिकार्यांनी ठेकेदाराला पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
परंतु ठेकेदाराने व नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली.
त्यामुळेच पहिल्या पावसात गावात पूर परिस्थिती निर्माण होऊन ४० कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत दूषित पाणी गेल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
तसेच गटारांचे पाणी घरात शिरल्याने आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्याचा दावा सरपंच मुरलीधर भोईर यांनी केला.