प्रत्येक २० किमी अंतरावर आपत्कालीन आरोग्य यंत्रणा हवी ; शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पनवेल दि.२३: दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव कालावधीत सायन-मुंबई व ठाणे-मुब्रामार्गे सार्वजनिक गणेश उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या महामार्गावर प्रत्येक वीस किमीवर तात्पुरती सार्वजनिक आरोग्य विभागाची आपत्कालीन आरोग्य यंत्रणा व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, विष्णू गवळी यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातात. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-शिळफाटा व कल्याणकडून येणारी वाहनांची संख्याही मोठी असते, नवी मुंबई वाहतूक विभागाकडून याकरिता योग्य नियोजन केले जाते, परंतु या वर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल झाल्याने मुंबई-गोवा महामार्गानि कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या दरवर्षीपेक्षा जास्त असू शकते, अशी शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या हद्दीत वाशी टोलनाका ते पळस्पा फाटा, नेरूळ, तुर्भे फ्लायओव्हर, सी.बी.डी. सर्कल, खारघर फलायओव्हर, कोपरा गाव, खारघर टोल नाका, कामोठे-कळंबोली सर्कल येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. शिळफाटा मुंब्रामार्गे येणाऱ्या व एमआयडीसीतून येणाऱ्या अवजड वाहनांमुळेही गणेशोत्सव काळात कोंडी होते. त्यामुळे महामार्गावर संभाव्य अपघाताची संख्या वाढू शकते. अशावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या महामार्गावरील प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत प्रत्येक वीस किमीवर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णु गवळी यांनी | जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली.
फोटो :शिरीष घरत.