मॅरेथॉन रिअॅलिटी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सने केली ग्राहकांची फसवणूक रहिवासीयांचा कार्यालयावर मोर्चा
पनवेल / प्रतिनिधी
सर्वोत्तम वसाहत अशी बिरुदावली लावून पनवेल शहराला लागून मोठी टाऊनशिप असलेल्या मॅरॅथॉन नेक्सझोन मधील संकुलातील एस.टी.पी. प्रकल्प व्यवस्थित कार्यान्वित नसल्याने पाण्याला उग्र घाण वास येवून मलसदृश्य पाणी येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने मॅरेथॉन नेक्सझोन रेसिडन्स वेलफेअर असोसिएशनने रविवारी कॅम्पस मधील रस्त्यावर उतरून बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला.
पनवेल शहराला लागून जेएनपीटी रोडवर सर्वोत्तम वसाहत अशी बिरुदावली लावून मॅरेथॉन रिअॅलिटी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या नावाने पळस्पा फाटा, पनवेल येथे मोठी टाऊनशिप उभारली आहे. एकूण 12 टॉवर उभारले असून शेकडो घरे बांधणार्या या प्रोजेक्टमध्ये एस.टी.पी. प्लान्ट गेले अनेक व्यवस्थित कार्यान्वित नसल्याने येथील पाण्याला घाण वास येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अनेकांना येथे उलट्या व जुलाब असे अनेक आजार उद्भवू लागल्याने नागरिकांनी मॅरेथॉन रिअॅलियाटीचे मॅनेजिंग डायरेक्टर चेतन शहा, सम्यक शहा यांना यासंबंधी सुचना देवूनही बांधकाम व्यावसायिक दुर्लक्ष करत असल्याने अखेर रहिवासीयांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर रविवारी मोर्चा काढला.
मोठमोठी प्रलोभने दाखवून ग्राहकांना आकर्षित करून घरेे घेणार्यांची घोर फसवणूक झाल्याने येथील नागरिकांकडून बोलले जात आहे. एवढी मोठी टाऊनशिप असलेल्या ठिकाणी एमएसईबीचे सबस्टेशन असणे गरजेचे असताना देखील आजूबाजूच्या गावातील लाईट गेली असताना आम्हालाही तासन्तास ग्रामीण भाग असल्याने वीजेविना रहावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे एम.जी.पी.एल. कडून रहिवासीयांना कमर्शियल दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मॅरेथॉन रियालिटीकडून ज्या प्रमाणात मेटनन्स घेतला जातो त्याप्रमाणे सेवेचा अभाव असल्याचे बोलले जात आहे. येथील स्विमींग पुल, जीम, क्लब हाउस ह्या मेंटेन नसल्याचे आमची घोर फसवणूक झाल्याचे येथील सदनिका धारकांकडून बोलले जात आहे. यासंबंधीचे निवेदन रविवारी मॅरेथॉन रियालिटीच्या कार्यालयात रहिवासीयांनी दिले असून येत्या 7 दिवसात यावर तोडगा काढवा अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रहिवासीयांनी दिला आहे.