केंद्रीय ‘सूक्ष्म’ उद्योग मंत्र्यांच्या विरोधात शिवसैनिकांचे ‘मोठे’आंदोलन गुन्हा दाखल करण्याचे पोलीस ठाण्यात निवेदन,रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर मध्ये पनवेल शहर जिल्हा शिवसेनेकडून नोंदवला निषेध
पनवेल/प्रतिनिधी:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करताना केंद्रीय सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी कानाखाली चढवली असती असे वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आक्रमक झाली आहे. पनवेल शहर जिल्हा शिवसेनेकडून खारघर येथे राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांना निवेदन देण्यात आले. व नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैमनस्य वाढतच गेले. सेनेवर शाब्दिक हल्ला चढवण्याची एकही संधी राणे यांनी कधीच सोडली नाही. त्यांच्या दोन्ही मुलांचे सातत्याने सेनेविरोधातील वक्तव्य कायम येतात. दरम्यान भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर नारायण राणे यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. दरम्यान शिवसेनेवर कुरघोडी करण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने त्यांना केंद्रीय सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्या कारभार दिला. दरम्यान मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली.
सोमवारी ही यात्रा महाड येथे आली असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जीभ घसरली.
‘त्यांचं ऍडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला ऍडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसर्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत.अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलने केले.
पनवेल शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीने ही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. खारघर मध्ये शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील , पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संघटक भरत पाटील
तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत,यतीन देशमुख, सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख , युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शहर अधिकारी, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, उपतालुका संघटिका टीया अरोरा-धुमाळ, उपमहानगर संघटिका रीना पाटील, शहर संघटिका अपूर्वा प्रभू, विभाग संघटिका संगीता राऊत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.